ग्रामपंचायतीविषयी

ग्रामपंचायत विडणी — यशोगाथा
ता. फलटण, जि. सातारा
प्रस्तावना
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात वसलेले विडणी हे गाव आज विकासाच्या एका नव्या युगाचे साक्षीदार ठरत आहे. श्री उत्तरेश्वर देवाच्या पवित्र भूमीवर वसलेल्या या गावाने अल्पावधीत जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून आपली नवी ओळख निर्माण केली आहे. लोकनियुक्त सरपंच मा. श्री. सागर कांतीलाल अभंग यांच्या नेतृत्वाखाली व विडणी विकास आघाडीच्या पाठबळातून गावाने बहुआयामी प्रगती साधली असून, ही यशोगाथा पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पायाभूत सुविधा, ग्रामरक्षण, पर्यावरण व प्रशासनाच्या प्रत्येक क्षेत्रात उमटली आहे.
विडणी ग्रामपंचायतीच्या या वाटचालीला राज्यस्तरावरून मान्यता मिळाली असून, २०२४ चा “राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्कार” आणि गोवा येथील “आदर्श सरपंच पुरस्कार” हे या समर्पित कार्याचेच फलित आहे.
सरपंचांचा संक्षिप्त परिचय
विडणी गावच्या राजकीय इतिहासात प्रथमच सर्वात कमी वय असलेले व थेट जनतेतून निवडून आलेले लोकनियुक्त सरपंच म्हणून श्री. सागर कांतीलाल अभंग यांची नोंद झाली आहे. त्यांचे आजोबा स्व. कृष्णराव केदारी अभंग ऊर्फ “गांधी आण्णा” हे महात्मा गांधी व महात्मा फुले यांच्या विचारांचे पाईक होते. श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे विनाविरोध संचालक म्हणून त्यांची कारकीर्द गाजली आणि त्यांच्याच प्रेरणेतून आज सरपंच महोदय गावाच्या सेवेसाठी झटत आहेत.
तब्बल चाळीस-पन्नास वर्षांनंतर विडणी गावाच्या विकासाचा गाडा रुळावर आणण्यासाठी आजच्या सरपंच महोदयांनी कठोर परिश्रम घेतले असून, त्यांच्या कार्यकाळातील एक वर्ष पूर्ण होताच केलेल्या कामांचा लेखाजोखा गावकऱ्यांसमोर पारदर्शकपणे मांडला जात आहे.
१. जलव्यवस्थापन — पाण्याचे शाश्वत नियोजन
पाणी हे ग्रामीण विकासाचे प्राण आहे, आणि विडणी ग्रामपंचायतीने हे ओळखून जलव्यवस्थापनात क्रांतिकारी पावले उचलली आहेत.
- पिण्याचे पाणी: जलजीवन मिशन अंतर्गत “हर घर नल” योजनेचे काम सुमारे ९०% पूर्ण झाले असून ही योजना अत्यल्प कालावधीत कार्यान्वित होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग, फलटण मार्फत २ द.ल.लि. क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र सन २०२४-२५ मध्ये उभारण्यात आले आहे.
- जलसंधारण: पाझर तलाव विडणी येथील खोलीकरण व दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून कोकरेवाडी येथे नवीन साठवण बंधारा बांधण्यात आला आहे.
- पाणी साठवण टाकी: गावठाणसह सात वाडी-वस्त्यांवर म्हणजे गावठाण, पवार वस्ती, कोकरेवाडी, अभंग वस्ती, २५ फाटा दहाबिघे, विद्यानगर व शिर्के वस्ती येथे पिण्याच्या पाण्याच्या नवीन टाक्यांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
- सांडपाणी व्यवस्थापन: बहुतांश ठिकाणी बंदिस्त गटारांची कामे पूर्ण झाली असून, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू असून प्रक्रियायुक्त पाण्याचा पुनर्वापर करून जलप्रदूषण रोखले जाणार आहे.
- पाणी बचत व वसुली: जलजीवन मिशनच्या नवीन कनेक्शनसाठी वॉटर मीटर खरेदी करण्यात आले असून, पाणीपट्टी वसुलीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
२. वीज व्यवस्थापन — अखंड पुरवठ्यासाठी आंदोलन व यश
विडणी गावासाठी पूर्वी होणारा वीज पुरवठा सतत खंडित होत होता तसेच कमी व्होल्टेजच्या समस्येमुळे ग्रामस्थ हैराण होते. सरपंच महोदयांच्या नेतृत्वाखाली कोळकी येथील सब-स्टेशनवरून लिंक लाईनचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आंदोलन उभारण्यात आले आणि या आंदोलनाला यश आले. आज गावातील वीज पुरवठा सुरळीत सुरू आहे.
- गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या व समाजमंदिरांत सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित — जि.प. शाळा विद्यानगर, जि.प. शाळा दहाबिघे, जि.प. शाळा सावतामाळी मळा, जि.प. शाळा कोकरेवाडी, अंगणवाडी विद्यानगर, संत रोहीदास वाचनालय इत्यादी ठिकाणी सौर ऊर्जा वापरली जात आहे.
- वाडी-वस्त्यांवरील वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यकतेनुसार नवीन ट्रान्सफॉर्मर/डीपीची कामे करण्यात आली आहेत.
- गावातील २४ ठिकाणी मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा) यांच्या विकास निधीतून रोडलाइट / पथदिवे बसवण्यात आले — विठोबा बिरोबा मंदिर कोकरेवाडी, श्री दत्त गणेशोत्सव मंडळ २५ फाटा चौक, शेंडे वस्ती, श्री हनुमान मंदिर दहाबिघे, श्री शिवलिंग मंदिर लिमटेक, वाघमारे वस्ती-आसू रोड, श्री तुळजाभवानी मंदिर काळुखेवस्ती, अभंग वस्ती-नवारे वस्ती चौक, विद्यानगर चौक, श्री जोतिबा मंदिर, श्री महादेव मंदिर चिंचेचा मळा, आदलिंगे वस्ती चौक, श्री संत सावतामाळी मंदिर, श्री संत ज्ञानेश्वर मंदिर, काळुखे वस्ती चौक, शिर्के वस्ती, अंगणवाडी विद्यानगर इत्यादी.
३. शैक्षणिक सुविधा — गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पायाभरणी
भविष्यातील पिढी सुदृढ व सक्षम बनावी यासाठी विडणी ग्रामपंचायत शिक्षण क्षेत्रात विशेष लक्ष देत आहे.
- गावातील २ जि.प. शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम सुरू करण्यात आल्या आहेत.
- गावातील १० अंगणवाडी शाळांना आधुनिक अध्ययन पद्धतीसाठी स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
- गावातील एकूण ६ अंगणवाडींना नवीन सुसज्ज इमारती मंजूर करण्यात आल्या असून काही इमारतींची कामे पूर्ण झाली आहेत — अंगणवाडी विद्यानगर, अंगणवाडी शेंडे वस्ती, अंगणवाडी कोकरेवाडी, अंगणवाडी २५ फाटा, अंगणवाडी लिमटेक, अंगणवाडी मांगोबामाळ, अंगणवाडी आदलिंगे वस्ती इत्यादी.
- विद्यानगर, दहाबिघे, सावतामाळी मळा, पवारवाडी या जि.प. शाळांना शौचालय बांधकाम पूर्ण.
- विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेसाठी हँड वॉश स्टेशन बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
- गावातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तसेच नागरिकांसाठी दोन सुसज्ज वाचनालयांची उभारणी करण्यात आली आहे.
- गावातील गरजू व शिकणाऱ्या १५० विद्यार्थिनींना खासदार फंडातून मोफत सायकल वितरण करण्यात आले आहे.
- ग्रंथालयासाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासकेंद्रात पुस्तक वाटप मोहीम राबवण्यात आली.
४. स्वच्छता — शुद्ध, सुंदर व आरोग्यदायी विडणी
स्वच्छ भारत अभियानाच्या प्रेरणेतून विडणी गावाने स्वच्छतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
- गावातील बहुतांश ठिकाणच्या बंदिस्त गटारांची कामे पूर्ण झाली असून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे.
- मांगोबामाळ येथे सार्वजनिक शौचालयाचे काम सुरू आहे.
- विडणी गावठाण हद्दीमध्ये जागोजागी कचरा कुंडी / डस्टबीन्स ठेवण्यात आले असून घरगुती कचऱ्याच्या संकलनासाठी २ घंटागाडी कार्यान्वित आहेत.
- संकलित कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी कंपोस्ट शेड उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.
- गाव पूर्णपणे हागणदारीमुक्त करण्यात यश आले असून, ग्रामसभा व सार्वजनिक कार्यक्रमांमधून जनजागृती सातत्याने सुरू आहे.
५. आरोग्य — गाव सुदृढ, गाव सुखी
ग्रामस्थांच्या उत्तम आरोग्यासाठी ग्रामपंचायतीने प्राथमिक आरोग्य सेवा बळकट केल्या आहेत.
- गावातील कार्यरत प्राथमिक आरोग्य उप केंद्राचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. आरोग्य केंद्रात मोफत औषधे उपलब्ध करून दिली जात असून, परिसरात पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे आणि वेस्टेज टाक्याचे व गप्पी मासे पालन टाक्याचे बांधकाम करण्यात आले आहे.
- नवजात व लहान बालकांसाठी लसीकरण कॅम्प नियमित आयोजित केले जातात.
- ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी रुग्णांना औषध पुरवठा केला जातो.
- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, यात्रा, पावसाळा सीझन व साथीच्या आजारांच्या वेळी औषध फवारणी / फॉगिंग केली जाते.
- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व यात्रेदरम्यान भाविकांसाठी मोफत वैद्यकीय शिबीर, स्वच्छ पाणी पुरवठा, सुसज्ज शौचालय व स्नानगृह तसेच मोफत मोबाइल चार्जिंग पॉइंट उपलब्ध करून दिले जातात.
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेअंतर्गत गावातील ६३ रुग्णांना आर्थिक लाभ मिळवून देण्यात आला, तर मागील वर्षी २२ रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ मिळाला.
६. पायाभूत सुविधा — विकासाची मजबूत पायाभरणी
पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात विडणी गावाने ऐतिहासिक प्रगती साधली आहे.
रस्ते
- गावातील वाड्या-वस्त्यांना तसेच इतर गावांना जोडणारे प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ८८ (विडणी–सांगवी) व प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १०८ (विडणी–राजाळे) या दोन्ही रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत.
- आसू रोड ते दहाबिघे हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेला रस्ता अंतिम टप्प्यात आहे.
- विडणी-वडले हा पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेला रस्ता प्रगतीपथावर आहे.
- गावातील विविध वाड्या-वस्त्यांवरील व अंतर्गत रस्त्यांची बहुसंख्य कामे पूर्ण झाली असून काहींची कामे सुरू आहेत — विद्यानगर ते गाव कमान (पंढरपूर रोड), २४ फाटा ते मोडूकाई, बौद्धनगर स्मशानभूमी, श्री भैरवनाथ मंदिर ते श्री लक्ष्मीआई मंदिर, आगवणे वस्ती, श्री उत्तरेश्वर चौक ते गावकमान, बडवे काका घर कोकरेवाडी ते दंडिले वस्ती, उत्तरेश्वर आळी, इंगळे–कदम वस्ती इत्यादी ठिकाणी रस्ते डांबरीकरण व काँक्रीटीकरणाची कामे पूर्ण व प्रगतीपथावर आहेत.
पूल
- ब्रिटिशकालीन (सन १९२१ मधील) निरा उजवा कालवा (कॅनॉल) वरील जुना पूल अरुंद असल्याने अनेक अपघात घडत होते. सरपंच महोदयांनी शासन दरबारी पाठपुरावा करून ५ कोटी रुपयांचा प्रशस्त नवीन पूल मंजूर करून घेतला असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे.
इतर पायाभूत सुविधा
- गावातील विविध शासकीय कार्यालये एकाच इमारतीत आणण्यात आली आहेत — तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस, एमएसईबी ऑफिस इत्यादी, ज्यामुळे नागरिकांच्या सोयीचा आणि वेळेचा बचाव होतो.
- गावातील नागरिकांसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एटीएम सुरू करण्यात आले आहे.
- गावातील महात्मा फुले भाजी मंडईसाठी स्वतंत्र जागा निश्चित करून तेथे मंडई भरवली जात आहे.
७. ग्रामरक्षण — सुरक्षित विडणी, सुरक्षित नागरिक
- गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामसभेत ठराव संमत करून पोलीस प्रशासन व संबंधित विभागांना निवेदने सादर.
- गावातील दारू दुकान बंद करून दारूबंदी करण्यासाठी २००० पेक्षा जास्त महिलांचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांना सादर.
- महिला, युवती व बालसुरक्षेसाठी पोलीस विभागाच्या निर्भया पथकाकडून मार्गदर्शन शिबिरे आयोजित.
- ग्राम रक्षक दलाची स्थापना करण्यात आली असून चोरी व इतर घटनांबाबत वेळोवेळी गस्त घातली जाते.
८. पर्यावरण संवर्धन — हरित विडणी अभियान
- गावातील विविध रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली असून त्यांचे जतन केले जात आहे.
- पावसाळा हंगामात शालेय विद्यार्थ्यांना विविध वृक्षांच्या रोपांचे वाटप केले जाते.
- पाझर तलावाचे खोलीकरण व दुरुस्ती करून जलसंवर्धनाचे काम सुरू आहे.
- कचरा संकलित करून गाव स्वच्छ ठेवले जात असून सांडपाणी प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर केला जाणार आहे.
९. प्रशासन व ई-प्रशासन — पारदर्शकता आणि लोकसहभाग
विडणी ग्रामपंचायत महाराष्ट्रातील पारदर्शक प्रशासनाचे एक उज्ज्वल उदाहरण ठरली आहे.
- गावच्या सर्व ग्रामसभा यु-ट्यूब लाईव्हद्वारे प्रक्षेपित केल्या जातात — विडणी ग्रामपंचायत ही राज्यातील कदाचित एकमेव अशी ग्रामपंचायत असेल जी प्रत्येक ग्रामसभेचे थेट प्रक्षेपण करते. सर्व पूर्वीच्या ग्रामसभांचे प्रक्षेपण यु-ट्यूब वर उपलब्ध आहे.
- गावामध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सर्व शासकीय योजनांचे प्रदर्शन व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित — यातून अनेक नागरिकांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ.
- ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांना गणवेश बंधनकारक करण्यात आला असून त्यांच्या कामात हलगर्जीपणा व नागरिकांची विनाकारण अडवणूक होऊ नये यासाठी सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. जिथे आढळले तिथे नियमानुसार कारवाईही करण्यात आली आहे.
- गावातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचे अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने सादर करणे सुलभ व्हावे यासाठी सरपंच जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे — पीएम किसान योजना, कृषी विभागाच्या विविध योजना, लाडकी बहीण योजना यासारख्या अनेक योजनांचे अर्ज भरण्यासाठी मदत केली जात आहे.
१०. शासकीय योजनांचा थेट लाभ ग्रामस्थांपर्यंत
सरपंच महोदयांच्या व ग्रामपंचायतीच्या सक्रिय पुढाकाराने गावातील पात्र लाभार्थ्यांना अनेक केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे:
- पंतप्रधान आवास योजना — कार्यकाळाच्या २ वर्षांत आतापर्यंत ८७+ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर.
- रमाई आवास योजना, मोदी आवास योजना, इतर आवास योजना — पात्र लाभार्थ्यांना लाभ.
- अंत्योदय अन्न योजना — एकूण २३६ पात्र अर्जदारांचे अर्ज भरून रेशनिंग कार्ड मंजूर.
- गावातील २४८ कुटुंबांना नव्याने रेशनिंगचा लाभ मिळवून दिला.
- बांधकाम कामगार योजना — मध्यान्ह भोजन, टूल बॉक्स, घरगुती भांडी, विद्यार्थी शिष्यवृत्ती.
- पीएम किसान योजना — २०४ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण.
- तांडा वस्ती सुधार योजना — व्हीजेएनटी प्रवर्गाच्या लोकवस्तीसाठी बंदिस्त गटारची ३ कामे, १ रस्ता व १ समाज मंदिराचे काम (एकूण ५ कामे) मंजूर व पूर्ण.
- अपंग / दिव्यांग योजना — पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ.
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, उज्ज्वला गॅस योजना, नमो शेतकरी सन्मान योजना यासारख्या अनेक योजनांचे लाभ मिळवून देण्यात आले.
११. कृषी तंत्रज्ञान — आधुनिक शेतीसाठी मार्गदर्शन
- कृषी विभागाच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांमार्फत ग्रामसभांमध्ये नियमित मार्गदर्शन — आधुनिक शेती औजारे व ठिबक सिंचनाबाबत जनजागृती.
- गावात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांना अधिक दर मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील डेअरींची दूध संकलन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आधुनिक मिल्किंग मशीन्स वापरण्यासाठी जनजागृती.
- ऊस, गहू व तत्सम पिकांच्या काढणीसाठी हार्वेस्टरचा वापर वाढविण्यात येत आहे.
- गरजू महिलांना अर्ध्या किंमतीत पिठाची गिरण वाटप करण्यात आले.
१२. सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम — सर्वसमावेशक नेतृत्व
विडणी गावच्या इतिहासात प्रथमच ग्रामपंचायतीच्या वतीने अनेक नवे उपक्रम राबवण्यात आले:
- ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू (२०२३ पासून) — कीर्तने, भारुडे, समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित.
- गणेशोत्सवात गावातील जवळपास १५००–२००० महिलांच्या हस्ते श्री गणेशाची आरती व गणपती विसर्जनाचा अनोखा सोहळा.
- मकर संक्रांती निमित्त १५००–२००० महिलांचा हळदी-कुंकू समारंभ — सौ. जिजामला नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित.
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त निवृत्त सैनिकांचा सन्मान.
- श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त सेल्फी पॉइंट निर्मिती.
- प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा (अयोध्या) सोहळ्याचे औचित्य साधून विडणी गावात कीर्तन सोहळा, संत पूजन व अन्नदान कार्यक्रम (२०२४).
- गणेशोत्सव २०२४ निमित्त मूर्ती प्रतिष्ठापना, कीर्तन, भारुड व कीर्तन कार्यक्रम, महिलांसाठी खेळ-पैठणी व अन्नदान, सर्वसामान्यांसाठी अन्नदान कार्यक्रम.
- महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित — श्री दत्त गार्डन कोळकी येथे महिला बचत गट प्रदर्शन कार्यक्रम.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी पंढरपूर, आदमापूर यासारख्या तीर्थक्षेत्रांच्या यात्रा आयोजित करून देवदर्शन घडवून आणले.
- गावातील गणेशोत्सव मंडळे, युवा मित्र मंडळे यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध — त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य.
१३. पुरस्कार व सन्मान
विडणी ग्रामपंचायत व सरपंच महोदयांच्या समर्पित कार्याची दखल राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे:
- राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्कार २०२४ — आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन, कोल्हापूर (सोलापूर जिल्हा शाखा) यांच्या वतीने प्रदान.
- गोवा येथे आदर्श सरपंच पुरस्कार.
- भारत विकास संकल्प यात्रेनिमित्त केंद्रीय गृह राज्यमंत्री मा. श्री. अजयजी मिश्रा साहेब व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा) यांच्यासमवेत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप.
१४. मान्यवरांच्या भेटी व मार्गदर्शन
विडणी ग्रामपंचायतीच्या विकासकामांना अनेक मान्यवरांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन व पाठबळ लाभले आहे:
- मा. खा. श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा) — खासदार, माढा लोकसभा मतदारसंघ.
- मा. आ. श्री. जयकुमार गोरे (भाऊ) — आमदार, माण-खटाव विधानसभा मतदारसंघ.
- मा. श्री. अजयजी मिश्रा — केंद्रीय गृह राज्यमंत्री.
- मा. रुपालीताई चाकणकर — राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा.
- सौ. जिजामला नाईक निंबाळकर — महिला सक्षमीकरण कार्यक्रमांच्या मार्गदर्शक.
उद्योन्मुख नेतृत्व — विडणीचा भविष्यवेध
- विडणी गावच्या राजकीय इतिहासात प्रथमच सर्वात कमी वय असलेले लोकनियुक्त सरपंच म्हणून श्री. सागर अभंग यांची नोंद.
- सर्व जाती-धर्मांच्या सुख-दुःखांच्या प्रसंगी सरपंच महोदय वैयक्तिक पातळीवर सहभागी होतात.
- गावच्या इतिहासात प्रथमच ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून समाजप्रबोधनाचा प्रवाह.
- महिला सक्षमीकरण हा प्राधान्याचा विषय — महिला बचत गटांना मार्गदर्शन शिबिरे, हळदी-कुंकू समारंभ, आरतीसारख्या कार्यक्रमांत सहभाग.
- युवा मित्र मंडळे व गणेशोत्सव मंडळांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांच्या प्रत्येक उपक्रमात सहभाग.
अशा प्रकारे गावातील सर्व समाज घटकांना व सर्व वयोगटातील नागरिकांसाठी विविध कार्यक्रम राबवून, गावाचा सर्वसमावेशक व सर्वांगीण विकास साधण्यासाठी उद्योन्मुख नेतृत्व म्हणून श्री. सागर अभंग यांनी स्वतःला सिद्ध केले आहे.
समारोप — विडणीचे पुढील पाऊल
ग्रामदैवत श्री उत्तरेश्वराच्या आशीर्वादाने व समस्त विडणीकरांच्या विश्वासाने सरपंच महोदयांनी आपल्या कारकिर्दीची दोन वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. पेयजल योजना, रस्ते, बंदिस्त गटारे, रोडलाइट, वाचनालय, शाळा-अंगणवाडी इमारती, पुलाची उभारणी अशा अनेक मूलभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत.
केंद्र शासन, राज्य शासन व जिल्हा नियोजन मंडळ यांच्या विविध योजनांमधून विडणीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला गेला आहे. तरूण सहकाऱ्यांच्या सक्रिय सहभागासह व ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादासह विडणी गाव विकासाची नवी शिखरे पादाक्रांत करत आहे.
“विडणी हे आज जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील आदर्श गाव म्हणून ओळखले जावे — हाच आमचा ध्यास, हीच आमची प्रार्थना.”
— श्री. सागर कांतीलाल अभंग, लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत विडणी
संपर्क
ग्रामपंचायत विडणी ता. फलटण, जि. सातारा — ४१५५२३ महाराष्ट्र, भारत